प्रतिनिधी – सचिन कोळी
कोल्हापूर :- कोनोली तर्फ असंडोलीपैकी पानारवाडी (ता. राधानगरी) येथे पती दारू पिऊन सतत त्रास देत असल्याच्या कारणावरून पत्नीने दोरीने गळा आवळून पतीचा खून केला. गणपती आनंदा कानडे (वय ३९) असे मृताचे नाव आहे. हे प्रकरण आपल्या अंगलट येण्याच्या शक्यतेने संशयित आरोपी महिलेने मृतदेह दोरीने तुळईस टांगून, पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव केला होता. संशयित आरोपी गीता गणपती कानडे (वय ३०) हिला गुरुवारी रात्रीच राधानगरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कोनोली तर्फ असंडोलीपैकी पानारवाडी येथे राहणाऱ्या गणपती व गीताचा विवाह काही वर्षांपूर्वी झाला. त्यांना दोन अपत्ये आहेत. गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास या दोघांमध्ये वाद झाला होता. त्यामुळे चिडलेल्या गीताने घरात कोणी नसल्याचे पाहून पतीचा गळा दोरीने आवळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनास्थळी डीवायएसपी साळुखे, राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कोळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक घाडगे आणि खान यांनी भेटी देऊन तपासाबाबत सूचना केल्या. आत्महत्येचा बनाव उघड
गीताने त्याच दोरीने स्वयंपाकघरातील तुळईस फास लावून घेतल्याप्रमाणे पतीचा मृतदेह टांगून आत्महत्येचा बनाव केला. घराबाहेर येऊन आरडाओरडा केल्याने गल्लीतील नागरिकांनी त्यास तत्काळ खाली उतरवून रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी मृत झाल्याचे सांगितले. यावेळी त्याच्या नातेवाईकांनी शंका आल्याने मृतदेह थेट पोलीस ठाण्यात नेला असता, पोलिसांनीही याबाबत शंका व्यक्त केली. तसेच गीताकडे अधिक चौकशी केली असता, तिने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेल्या वस्तूही जप्त केल्या आहेत.