धुळे: धुळे महानगरपालिकेच्या फक्त हद्दवाढीनंतर दहा गावांचा समावेश महानगरपालिकेच्या हद्दीत करण्यात आलेला होता. शासनाच्या नियमाप्रमाणे कुठेही पाच वर्षापर्यंत घरपट्टी व मालमत्ता कर वाढू नये असा एक अलिखित नियम आहे. असे असताना गेल्या चार वर्षांमध्ये धुळे महानगरपालिकेने दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने घरपट्टी आकारणी व मालमत्ता कराची आकारनी केली. तसेच यावर्षी 2022-23 वाढीव घरपट्टीच्या नोटिसाही सर्वांना देण्यात आल्या. यामध्ये नागरिकांच्या घरपट्टीमध्ये व मालमत्ता करामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे. घरपट्टी व मालमत्ता करांमध्ये चार ते पाच पटीने वाढ करून लोकांना नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत. परंतु हे नागरिकांवर अन्यायकारक आहे. अशी घरपट्टी त्वरित रद्द करण्यात यावी तसेच नोटीसा मागे घ्यावी, यासाठी वलवाडी उपनगर परिसरातील असंख्य नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने श्री. रणजित राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आज एकत्र येऊन धुळे महानगरपालिके समोर आंदोलन केले. जर या वाढीव घरपट्टी रद्द केल्या नाही तर महानगरपालिकेसमोर सर्व नागरिक ठिय्या आंदोलन करतील असा इशारा यावेळेस रणजीत राजे भोसले यांनी दिला.
हद्दवाढ परिसरामध्ये कोणतेही सुख सुविधा महानगरपालिका देत नाही, आठ ते दहा दिवसात पाणी येते, घंटागाडी तर येतच नाही, रस्ते खराब,गटारींची खराब व्यवस्था आणि पथदिवे बंद आहेत, अशा परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने घरपट्टी व मालमत्ता कर भरावा असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलेला आहे.यावेळी जितू पाटील,आबा पाटील, जगदीश चव्हाण, मुकेश खरात, महेंद्र शिरसाठ, मयूर देवरे, दीपक देसले, गोलू नागमाल, प्रणव भोसले, संजय माळी,सुमित काळे, राजू सोळुंकी,प्रशांत बोरसे, अभिषेख वाघ व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर मागणी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाने पाठींबा दिला होता.