DPT NEWS NETWORK 🗞️✍️. प्रतिनिधी:- राहुल आगळे
नंदुरबार :- आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यांत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने तीन गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. तिघेही गुन्हेगार शहादा तालुक्यातील सारंगखेडा पोलीस ठाणे हद्दीतील आहेत.
आनंदा धोंडू कोळी (५७) रा. शेल्टी तालुका शहादा, रजत आनंदा साळवे (२६)रा शेल्टी , राहुल आनंदा साळवे (३०) शेल्टी ता. शहादा अशी तीघांची नावे आहेत. पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील यांनी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेसाठी बाधा ठरणारे तसेच मालमत्ता व शरीराविरूद्धचे गुन्हे करणाऱ्यांची माहिती घेत दाखल गुन्हाचा आढावा घेतला होता. या अंतर्गत सारंगखेडा पोलीस ठाणे हद्दीतील शेल्टी येथील तिघे गुन्हेगार दहशत व वचक ठेवण्यासाठी बेकायदेशीररीत्या टोळी तयार करून गुन्हे करतं असल्याचे समोर आले होते. येत्या काळातही त्याच्या कडून गुन्हे घडण्याची शक्यता असल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.
तिघांना येत्या ४८ तासात जिल्हा हद्दीबाहेर जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आगामी दोन वर्षांचा काळात जिल्ह्यांत परत येताना पोलीस अधीक्षक किंवा न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक असल्याचे पोलीस दलाकडून कळविण्यात आले आहे. हद्दपार आदेशाचे उल्लंघन झाल्यास त्यांचे विरूद्ध प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी दिली आहे.