DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- सुनिल मैदीले
भिवापूर :- विना रॉयल्टी ओव्हरलोड वाळू भरलेल्या दोन टिप्परवर भिवापूर पोलिसांनी कारवाई करीत एकूण 45,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सोमवारी (दि.8) सकाळी नाकाबंदी दरम्यान येथील पोलीस स्टेशन टी पॉईंटवर वरील कारवाई करण्यात आली. दोन्ही टिप्परचे चालक व मालक यांच्या विरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले. ठाणेदार प्रमोद चौधरी यांनी वाहन तपासणीकरिता सोमवारी सकाळी महामार्गांवरील टी पॉईंटवर नाकाबंदी केली होती. नऊ वाजता दरम्यान टिप्पर क्र. एमएच 49 एटी 4371 व एमएच 49 एटी 5185 हे निलज वरून उमरेडच्या दिशेने जाताना दिसून आले. थांबवून पाहणी केली असता त्यात ओव्हरलोड वाळू भरलेली आढळून आली. मात्र चालकांकडे वाळूची रॉयल्टी नसल्याने दोन्ही टिप्पर पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले. यात दोन टिप्पर एकूण किंमत 45 लक्ष व 14 ब्रास वाळू किंमत 70 हजार असा एकूण 45 लक्ष 70 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. हेड कॉन्स्टेबल राकेश त्रिपाठी यांच्या तक्रारीवरून चालक ज्ञानीवंत गोपाळा हिवरकर 33 रा. जीवनापूर ता. कुही व दिपक श्रीकृष्ण सोनडवले 25 रा. बोडकीपेठ यांच्यासह त्यांच्या मालकाविरुद्ध भादवीच्या कलम 379, 109 व महा. जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 48(8) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. ठाणेदार चौधरी यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक संदीप सडमेक आणी हेड कॉन्स्टेबल प्रवीण जाधव पुढील तपास करीत आहेत. अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध भिवापूर पोलिसांकडून लागोपाठ करण्यात येत असलेल्या कारवाईमुळे वाळू तस्करांचे चांगलेच धाबे दनाणले आहेत.
फोटो – जप्त टिप्परसह ठाणेदार चौधरी, हेड.काँ. त्रिपाठी व यादव