DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- सुनिल मैदीले
भिवापूर :- अल्पवयिन विद्यार्थिनींची येता जाता छेड काढणाऱ्या कोलारी येथील मजनूला ठाणेदाराने विद्यार्थिनींसमोरच बदडून काढले. त्याच्याविरुद्ध पोक्सोसह विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.
मंगेश धनविजे 33 असे मजनूचे नाव असून तो येथून चार किमी अंतरावर असलेल्या कोलारी येथील रहिवासी आहे. कोलारी येथील विद्यार्थिनी शिक्षणासाठी भिवापूर येथे दररोज ये जा करतात. आरोपी मंगेश हा त्यांच्या शाळेत जाण्या येण्याच्या वेळेस बस स्टॅन्ड वर उभा राहून त्यांना अश्लील इशारे करायचा. कधी कधी तो मुलींच्या मागोमाग भिवापूरला सुद्धा यायचा. मागील महिनाभरापासून सुरु असलेल्या या प्रकारामुळे मुली घाबरून होत्या.
आज सकाळी विद्यार्थिनींचा पाठलाग करीत आरोपी मंगेश कोलारी बस स्टॅन्ड वर पोहचला. तिथे बसची वाट बघत उभ्या असलेल्या विद्यार्थिनींकडे तो वासनांध नजरेने बघत होता. त्याचे तसे बघणे सहन न झाल्याने एका विद्यार्थिनीने हिम्मत करीत त्याला असं का बघतोस म्हणून हटकले. त्यावर चिढलेल्या आरोपीने तीला अश्लील शिवीगाळ केली. दरम्यान एसटी बस आल्याने सर्व मुली बस मध्ये बसून भिवापूरला पोहचल्या. त्यांच्या पाठोपाठ आरोपी सुद्धा दुचाकीने भिवापूरला आला. न्यायालयासमोरील बस स्टॅन्ड वर मुली बस मधून उतरताच आरोपीने त्याला हटकणाऱ्या मुलीला पुन्हा अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे उपस्थित विद्यार्थिनी प्रचंड घाबरल्यात. त्यातील एकीने शाळेच्या मुख्याध्यापकांना फोन करून याबाबत माहिती दिली. संबंधित शाळेतील एका शिक्षकाने घटनास्थळी जाऊन आरोपीला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी त्यांनाही जुमानत नव्हता. दरम्यान शाळेच्या मुख्याध्यापकांनी ठाणेदार जयकिशोर निर्मल यांना फोन करून माहिती दिली. निर्मल यांनी लगेच घटनास्थळी धाव घेत मजनूगिरी करणाऱ्या मंगेश ला ताब्यात घेतले. तिथे उपस्थित विद्यार्थिनींनी त्याच्याकडून होत असलेल्या त्रासाची निर्मल यांना माहिती दिली. ते ऐकून संतापलेल्या निर्मल यांनी आरोपीला मुलींसमोरच बदडून काढले. पिडीत विद्यार्थिनींचे नंतर त्यांच्या शाळेत जाऊन पोलिसांनी बयान नोंदविले. त्याआधारे आरोपी मंगेशविरुद्ध कलम 74, 78, 79 व पोक्सोच्या कलम 8, 12 अन्वये गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली. पोलीस पुढील तपास करीत आहेत.